छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाची १७ लाख ४९ हजार ९०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नकुल विजय सांगळे (वय २५, रा. अंगुरीबाग) याला आरोपी सिमेश हुसेन मोहम्मद, अविनाथ गुंडपल्ली, इनोश कोलापुडी आणि अब्दुल मोहम्मद रऊफ (सर्व रा. हैदराबाद, तेलंगणा) यांनी परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवले. २० सप्टेंबर २०२४ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान आरोपींनी नकुलचा विश्वास संपादन करून त्याला बनावट
नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर वेळोवेळी आरटीजीएस आणि क्रेडिट कार्डद्वारे एकूण १७ लाख ४९ हजार ९०० रुपये उकळले. पैसे दिल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने नकुलने हैदराबाद येथे जाऊन स्वतःचे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्याला पट्ट्याने मारहाण करीत पुन्हा पैसे मागायला हैदराबादला आलास तर जिवंत परत जाणार नाहीस, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नकुल सांगळे यांच्या अर्जावरून पोलीस चौकशीनंतर २१ ऑगस्ट रोजी सिटी चौक पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बुधा कशिदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














